
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आर्च एंटरप्रायझेसतर्फे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना कर्तृत्वआभा सन्मान व कर्तृत्वआभा कौतुक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विनीत गोरे यांच्या संकल्पनेतून विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात पार पडलेल्या या सोहळ्यात मृणालिनी नानिवडेकर (पत्रकार), डॉ. साधना भातखंडे (वैद्यकीय), तेजस्विनी लेले (भरतनाटय़म), कल्याणी देशपांडे (उद्योग) यांना कर्तृत्वआभा सन्मान तर लेखिका व कवयित्री लता गुठे यांना कर्तृत्वआभा कौतुक पुरस्काराने ज्येष्ठ शास्त्राrय गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर आणि आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी पार पडलेल्या सुलोचना या विशेष कार्यक्रमात दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्यावर चित्रित झालेली लोकप्रिय गाणी आणि सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुलोचना जाधव यांनी गाऊन अजरामर केलेल्या फक्कड लावण्या या मानसी परांजपे, मधुरा देशपांडे व गायिका व संयोजिका अर्चना गोरे यांनी सादर करून रसिकांची दाद मिळविली.
कार्यक्रमाचं निवेदन श्रेयसी वझे-मंत्रवादी यांनी केलं तर कार्यक्रमाचे संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे ह्यांचे होते. सर्वच लावण्यांसाठी ढोलकीची बेमालूम साथसंगत करणाऱ्या प्रभाकर मोसमकर यांनी रसिकांची विशेष दाद मिळविली.