दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखेच एक प्रकरण बंगळुरूमध्ये समोर आले आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 30 पेक्षा जास्त तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ओळखीच्या व्यक्तीने महिलेची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
महालक्ष्मी असे या 29 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आले. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले होते. ही घटना व्यालीकेवल पोलीस ठाण्याच्या परिसरातील मल्लेश्वरम भागात घडली. हा खून 4 ते 5 दिवसांपूर्वीच झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ञांची टीमही घटनास्थळी दाखल झाली.
माहितीनुसार, महालक्ष्मी दुसऱ्या राज्यातील रहिवासी असून ती पतीपासून विभक्त झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती येथे भाड्याने राहत होती. बंगळुरूमध्ये एका मॉलमध्ये ती काम करायची. तिचा पती शहरापासून दूर एका आश्रमात काम करतो. घटनेची माहिती मिळताच तोही घटनास्थळी पोहोचला.