आदिवासी महिलेवर अत्याचार करून जिवंत जाळले… अवघा देश सुन्न; भाजपशासित मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक

भाजपशासित मणिपूरमध्ये जातीय संघर्षातून सुरु असलेल्या हिंसाचाराचा पुन्हा आगडोंब उसळला आहे. शस्त्रधारी हल्लेखोरांनी गुरुवारी रात्री एका आदिवासी महिलेवर अत्यंत पाशवी व क्रूर पद्धतीने सामूहिक अत्याचार केला आणि तिला जिवंत जाळले. या भयंकर घटनेनंतर अवघा देश सुन्न झाला आहे. हल्लेखोरांनी अत्याचारानंतर एकापाठोपाठ 17 घरे पेटवली. यापूर्वी जुलै महिन्यात कुकी समुदायातील दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती.

जिरीबाम जिह्यात आदिवासी महिलेवर झालेला अत्याचार व नंतर उसळलेल्या हिंसाचारावरून भाजप सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शस्त्रधारी हल्लेखोरांनी गावात घुसखोरी करताच घरांना आगी लावल्या आणि अंदाधुंद गोळीबार सुरु ठेवला. त्यामुळे हादरलेल्या नागरिकांनी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळापळ केली. मात्र 33 वर्षांची महिला घरात अडकली. तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत हल्लेखोरांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आणि तिला जिवंत पेटवले. पीडित महिला तीन चिमुरडय़ांची माता आहे. मणिपूरमध्ये जातीय संघर्ष सुरु असतानाच ही भयंकर घटना घडली. या घटनेने महिला सुरक्षेकामी भाजप सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी जातीच्या कारणावरून अत्याचार आणि हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. नराधम हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. हल्लेखोर स्थानिक रहिवासी असू शकतात, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

मुख्यमंत्र्यांनी हिंसाचार भडकावला!

बहुसंख्य मैतेई आणि आदिवासी कुकी समुदायातील जातीय संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत. हिंसाचाराने तब्बल 230 हून अधिक लोकांचा बळी घेतला असून 50 हजारपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. ही भयंकर परिस्थिती ‘जैसे थे’ असतानाच संपूर्ण हिंसाचार भाजपचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी भडकावल्याचा आरोप कुकी समुदायाने केला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात ऑडिओ क्लिप सादर केल्या आहेत.