
हिंदुस्थानातील ब्लू-कॉलर नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग अजूनही मर्यादित असल्याचे इंडीडच्या नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ऑटोमोबाईल, बीएफएसआय, ई-वाणिज्य, प्रवास व आदरातिथ्य, एफएमसीजी, उत्पादन यांसह 14 उद्योगांच्या सर्वेक्षणातून ही बाब अधोरेखित झाली आहे. प्रत्येक पाच ब्लू-कॉलर. या सर्वेक्षणानुसार देशातील प्रत्येक पाच ब्लू-कॉलर कामगारांमध्ये केवळ एक महिला असून वेतनातील असमानता, कामाच्या ठिकाणच्या असुविधा आणि करिअरच्या मर्यादित संधी यामुळे महिला कर्मचाऱयांची संख्या या क्षेत्रात मर्यादित असल्याचे उघड झाले आहे.
इंडीडने आपल्या या सर्वेक्षणात नवीन 14 प्रमुख उद्योगांमधील टियर-1 आणि टियर-2 शहरांतील कामगारांचे सर्वेक्षण केले. यात 73 टक्के कंपन्यांनी 2024 मध्ये महिलांना नोकऱ्या दिल्याचे स्पष्ट केले. असे असले तरीही एकूणच महिलांचा सहभाग केवळ 20 टक्के असल्याचे दिसत आहे. रिटेल, आरोग्यसेवा, औषधनिर्माण, बांधकाम आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे. मात्र, दूरसंचार, बीएफएसआय आणि आयटी/आयटीईएस क्षेत्रांत महिलांचा सहभाग 10 टक्क्यांपेक्षाही कमी राहिला आहे. या सर्वेक्षणानुसार महिलांना ब्लू-कॉलर नोकऱयांमध्ये प्रवेश करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. कामाचे काटेकोर असे वेळापत्रक व लवचिकतेचा अभाव असलेले कामाचे वेळापत्रक, वेतनातील तफावत आणि करिअर वृद्धीच्या संधींची मर्यादा ही त्यातील प्रमुख कारणे आहेत. शिवाय या सर्वेक्षणानुसार, 42 टक्के महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱयांच्या तुलनेत कमी वेतन मिळते, तर अनेकांना पदोन्नतीच्या संधीही अपुऱया मिळतात, ही बाबही समोर आली आहे.