ऐकण्याच्या बाबतही महिला वरचढ, संशोधनातून नवी माहिती समोर

आपल्या शरिरातील प्रत्येक अवयवाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. हात पाय, नाक-डोळे हे सगळेच अवयव आपली कामे चोख करतात. स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाच्या शरिरात हे अवयव सारखेच काम करतात असं नाही. याबाबतचा एक धक्कादायक खुलासा ब्रिटीश आणि फ्रान्स संशोधकांनी केला आहे. या संशोधकांच्या मते पुरुषांपेक्षा महिलांची श्रवण क्षमता ही उत्तम आहे. महिला वर्ग पुरुषांपेक्षा सगळ्याच कामात वरचढ ठरला आहे. या संशोधनामुळे स्त्रीयांची बाजू अधिकच बळकट होत आहे.

संशोधकांनी 13 देशांमध्ये केलेल्या या अभ्यासात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सुमारे दोन डेसिबल जास्त ऐकण्याची क्षमता असते. महिलांच्या कानातील ‘कॉक्लीया’ नावाच्या भागाची रचना वेगळी असते. त्यामुळे महिलांची श्रवण क्षमता पुरुषांपेक्षा चांगली असू शकते. कॉक्लिया हा द्रवपदार्थांनी भरलेला एक लहान अवयव आहे जो ध्वनी लहरींना आपल्या मेंदूपर्यत जाण्यात मदत करतात. याशिवाय लहानपणापासून शरिराची वाढ होताना होणारे हार्मोनल बदल देखील ऐकण्याच्या क्षमतेत हा फरक निर्माण करू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संशोधनाच्या मते उच्च श्रवण क्षमता फायदेशीर असली तरी, खूप आवाज असलेल्या ठिकाणी आपण जास्त वेळ उभे राहू शकत नाही. यामुळे कामाच्या पडद्याला त्रास होऊ शकतो. सतत जास्त आवाज ऐकल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो. शांत झोप न येणे आणि हृदयाशी संबंधित काही समस्या देखील उद्भवू शकतात.