भांडुप येथील ड्रीम मॉलच्या तळघरात साचलेल्या पाण्यावर एका महिलेचा तरंगताना मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनीषा गायकवाड (40) असे तिचे नाव असल्याचे समजते. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
रविवारी दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलात खोलीमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असताना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ड्रीम मॉलच्या तळघरात साचलेल्या पाण्यामध्ये एका तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि मुलुंड जनरल इस्पितळात नेला. आता शवविच्छेदन झाल्यानंतर त्या तरुणीचा नेमका मृत्यू कसा झाला ते समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत महिला एलबीएस मार्गावरील काका पेट्रोल पंप परिसरात राहत होती. भांडुप पश्चिमेला असलेला ड्रीम मॉल गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास बंद अवस्थेत आहे. मॉलमधील काही दुकाने आणि कॉल सेंटर सुरू आहेत. त्यामुळे मॉलमध्ये फार रहदारी नसते. प्रेमीयुगुल तसेच टपोरी तरुणांचा तिथे राबता असतो असे नागरिकांकडून सांगण्यात येते. पोलीस अधिक तपास करत आहेत.