वांगी पाठोपाठ मांडणातही अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी

राज्याचे वक्फ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात सुरू असलेल्या प्रवचनात आरडाओरड करून तेथे बसलेल्या महिलांचा अपमान केला. याचा निषेध म्हणून काल वांगी येथे सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची भर चौकात होळी करण्यात आली. तालुक्यातील मांडणा गावातही या आचरटपणाचे पडसाद उमटले असून, संतप्त महिलांनी सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी करून त्यांच्याविरोधात ठणाणा केला.

सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे शनिवारी नवरात्रोत्सवानिमित्त ओम पाटील पुंगळे यांचे व्याख्यान चालू होते. बांगलादेशातील सद्य:परिस्थितीवर व्याख्याते बोलत असतानाच एक मुस्लिम महिला चपलांसहित मंदिरात घुसली. बांगलादेशातील मुस्लिमांबद्दल का बोलत आहात म्हणून तिने कांगावा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या महिलांना ‘तुम्हाला मंत्री अब्दुल सत्तार यांच्या साड्या कशा गोड लागल्या’ असे म्हणाली. यामुळे संतापलेल्या महिलांनी सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची भरचौकात होळी केली.

आज मांडणा येथेही या घटनेचे पडसाद उमटले. मांडणा येथील महिलांनी अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्या घराघरांतून गोळा करून भरचौकात त्यांची होळी केली. सिल्लोड तालुक्यात हे लोण पसरले असून, अनेक गावांमध्ये सत्तारांचा निषेध म्हणून त्यांनी वाटलेल्या साड्यांची होळी करण्यात येणार आहे.