
>> मंगेश मोरे
बदलापूरच्या घटनेनंतर उच्च न्यायालयाने शाळकरी मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत सक्त आदेश दिल्यानंतरही सरकार ढिम्म राहिल्याने राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील दोन वर्षांत मुंबईत घडलेल्या बलात्काराच्या 2109 घटनांतील तब्बल 406 नराधम अद्याप मोकाट आहेत. त्यातून ‘लेकी’च्या सुरक्षेत मिंधे-भाजप सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या राजधानीचे शहर असलेली मुंबई इतर ठिकाणच्या तुलनेत महिलांसाठी अधिक सुरक्षित मानली जाते. याच मुंबईत दोन वर्षांत लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मुख्य संगणक कक्षाने अॅड. जतीन आढाव यांच्या माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जावर उत्तर देताना धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यानुसार 2023 ते फेब्रुवारी 2025 या अवधीत मुंबईत बलात्काराच्या 2109 घटनांची नोंद झाली. 2023 मध्ये 977 घटना घडल्या. या घटनांतील केवळ 603 आरोपींना अटक करण्यात आली, तर 374 नराधम मोकाट आहेत. 2024 मध्ये बलात्काराच्या तब्बल 1050 घटनांची नोंद झाली. त्या घटनांतील 1038 पकडण्यात आले, तर 12 नराधम अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. नवीन वर्षाच्या दोन महिन्यांत बलात्काराचे 82 गुन्हे नोंद झाले. त्यातील 62 गुह्यांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली, उर्वरित 20 नराधम फरार आहेत. कित्येक आरोपी बलात्काराचा गुन्हा दाखल होताच लगेच फरार झाले. उच्च न्यायालयाने सक्त आदेश दिल्यानंतरही राज्याचा गृह विभाग व मुंबई पोलीस बलात्काराच्या गुह्यांच्या तपासात गंभीर नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
मुंबईसह राज्यभरात महिला सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुह्याचा तपास, खटला या टप्प्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यासाठी ‘सेंट्रल ट्रकिंग सिस्टम’ कार्यान्वित केली पाहिजे. सरकारने याबाबत वेळीच ठोस पावले न उचलल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत.
दोन वर्षांत 2109 बलात्कार
मुंबईत दोन वर्षांत दाखल झालेल्या बलात्काराच्या 2109 घटनांमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटनांचाही समावेश आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या विचारात घेता फरार नराधमांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तपासात गांभीर्य दाखवून फरार नराधमांना वेळीच अटक करावी, अशी मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे.