
महायुती सरकारमधील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या पीडित महिलेलाच आज एक कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही रक्कम स्वीकारतानाच संबंधित महिलेला रंगेहाथ पकडल्याचा दावा पोलिसांनी केला असला, तरी ती अडकली, की तिला अडकवले, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
गोरे कंपूकडून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याने आपल्याला संघर्ष करण्यापासून पर्याय नाही, असे सांगत पीडित महिलेने 17 मार्चपासून विधान भवनासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. यादरम्यान हे प्रकरण लावून धरणाऱया व यू-टय़ूब चॅनल चालवणाऱ्या पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात खंडणी, विनयभंग, अॅट्रॉसिटी यांसारखे गंभीर गुन्हे धडाधड दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, ‘तोंड बंद ठेव, अन्यथा तुषार खरातची जी हालत केली, ती तुझी करू’ अशा धमक्या परहस्ते आपल्याला येत असल्याचे पीडित महिलेने म्हटले होते आणि आज एक कोटीच्या खंडणीप्रकरणी या महिलेला अटक झाली आहे. त्यामुळेच या कारवाईबद्दल शंका घेतली जात आहे. उपोषणाला न बसण्यासाठी महिलेने 3 कोटींची खंडणी वकिलामार्फत मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र हे पोलीस स्टेट बनले – संजय राऊत
‘ज्याप्रकारे पत्रकार तुषार खरात यांना अटक केली, त्याच पद्धतीने त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. हा ‘मिस युज ऑफ पॉवर’ आहे. महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनले आहे. पोलीस काहीही करतात आणि पोलिसांना कोणतेही अधिकार दिले जातात,’ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.
एक कोटी पॅश आलेच कोठून? – सुप्रिया सुळे
याच डबल इंजिन सरकारने नोटाबंदी केली. मग एक कोटी रुपये पॅश देणाऱ्याकडे आले कोठून? याची ईडी, सीबीआयने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या महिलेने खरंच पैसे मागितले की, सरकारचा हा खोटानाटा खेळ आहे, याचे स्पष्टीकरण सरकारला द्यावे लागेल. तसेच हे पैसे नक्की त्या महिलेकडे मिळाले की पिशवीत कोणीतरी टाकले? हा खूप गंभीर विषय आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पुरी दालही काली हैं – वडेट्टीवार
कशासाठी एक कोटी मागितले? कशासाठी ती महिला ब्लॅकमेल करत होती? कशासाठी एक कोटी देत होते? कुछ तो दाल में काला होगा, या पुरी दालही काली होगी? काहीतरी गडबड आहे. सत्तेचा उपयोग हवा तसा करता येतो, हे यापूर्वीही दिसले आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.