मणिपूर पुन्हा हादरलं! आधी केला अत्याचार, नंतर महिलेला जिवंत जाळलं; संपूर्ण घटना जाणून धक्काच बसेल

मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार थांबलेला नाही. यातच पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जिरीबाम जिल्ह्यातील एका गावात एका 31 वर्षीय आदिवासी महिलेवर अत्याचार करून तिला पेटवून देण्यात आल्याची घटना येथे घडली आहे. ही महिला तीन मुलांची आई होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारीच काही सशस्त्र लोकांनी घरावर हल्ला केला होता. मृत महिलेच्या पतीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हिंसाचार जातीय आधारावर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आरोपींची ओळख पटू शकली नाही. आरोपी हे घाटीतील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेची माहिती देताना पीडितेच्या पतीने सांगितले की, जौरवण गावातील पहिल्या घरावर आधी हल्ला झाला. यानंतर महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. मणिपूरमध्ये आधीही अशा घटना समोर आल्या आहेत. येथे एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची घटनाही समोर आली होती. पोलिसांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह फॉरेन्सिक चाचणीसाठी आसामला पाठवण्यात आला आहे.

जिरीबामच्या पोलीस अधीक्षक म्हणाले की, राजधानीत शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणीची सुविधा आहे, परंतु मृतदेह जिरीबामहून इम्फाळला नेणे खूप अवघड आहे. 7 सप्टेंबर रोजी जिरीबाममध्येच झालेल्या चकमकीत सात जणांचा मृत्यू झाला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते की, अतिरेक्यांच्या एका गटाने सहा घरांना आग लावली. प्रथमिक अहवालात असे सूचित होते की, अनेक गावकरी हल्ल्यादरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी जवळच्या जंगलात आश्रय घेतला. ते म्हणाले, जाळपोळीमुळे किमान सहा घरांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.