उज्जैनमध्ये भररस्त्यात बलात्कार; मदत न करता, लोक शूट करत होते

मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे एका कचरा आणि भंगार वेचणाऱ्या महिलेला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे येथील पदपथावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांपैकी कुणीही या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट या घटनेचे चित्रीकरण करत बसले. या घटनेमुळे महिलांवरील अत्याचारांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून लोकांच्या संवेदना मेल्या आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

एका इसमाने या महिलेला लग्नाचे वचन दिले होते. त्याने तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले आणि पदपथाच्या बाजूलाच त्याने तिच्यावर बलात्कार केला. घटनास्थळवरून पळून जाण्यापूर्वी या इसमाने तिला याबाबत कुठेही काहीही न बोलण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती आणि व्हिडीओ आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक ओम प्रकाश मिश्रा यांनी दिली.

उज्जैनमधील घटना मानवतेला कलंक- राहुल गांधी

महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना मानवतेला कलंक आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. देशासाठी चिंतन करण्याचा विषय आहे, असेही त्यांनी एक्सवरून म्हटले आहे. प्रचारकेंद्रित सरकारांनी खोटी प्रतिमा समाजात रुजवण्यासाठी एका असंवेदनशील व्यवस्थेला जन्म दिला आहे. या व्यवस्थेच्या महिला शिकार ठरत आहेत. त्यामुळे आता ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.