सावकारीला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, मायक्रो फायनान्सच्या आडून रत्नागिरीत फोफावली खासगी सावकारी

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आडून रत्नागिरी जिह्यात खासगी सावकारी पह्फावली आहे. कर्जावरील व्याजाचा दर असुरक्षित कर्ज म्हणून 24 ते 36 टक्क्यांपर्यंत असतात. त्यामुळे मासिक हप्त्याची रक्कम दहा-पंधरा हजारांपासून 30-40 हजारांपर्यंत गेली आहे. या सावकारीने रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावात एका महिलेचा बळी घेतला आहे, तर हप्ता आणि व्याज मिळत नाही म्हणून संबंधित व्यक्तीच्या पत्नीलाच सावकाराने स्वतःच्या घरी डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे.

रत्नागिरी जिह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी नियमबाह्य बेसुमार कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे हजारो महिला कर्जाच्या सापळय़ात अडकल्या आहेत. अनेक कंपन्यांनी पहिले कर्ज फिटण्यापूर्वी दुसरे, तिसरे कर्ज दिले आहे. नियम डावलून आठ-आठ, दहा-दहा कंपन्यांनी एकाच व्यक्तीला कर्ज दिले आहे. कर्जाचा हप्ता वसूल करण्यासाठी कंपन्यांचे एजंट दादागिरी करतात. रात्री अपरात्री घरात घुसतात. एजंट पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, याची कल्पना असल्यामुळे घरातील दागिने, आमराई गहाण टाकत आहेत.