
हिंदी चित्रपटाप्रमाणे सायबर ठगाने बनावट न्यायालय उभारून महिलेविरोधात ऑनलाइन खटला भरवला. खटला भरवून तिला दोषी ठरवत शिक्षादेखील ठोठावली. शिक्षेतून बाहेर काढण्याच्या नावाखाली 4 कोटी 82 लाख उकळले. फसवणूकप्रकरणी दोघांना मध्य सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बापी दास आणि सुरीश नाग अशी त्या दोघांची नावे आहेत. अशा प्रकारे फसवणूक केल्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे.
माटुंगा येथे वृद्ध महिला राहते. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना एका नंबरवरून रिचार्जसाठी फोन आला होता. फोन करणाऱ्याने ग्राहक प्रतिनिधीशी संवाद साधण्यासाठी 9 क्रमांक प्रेस करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तो क्रमांक दाबला. फोनवर बोलणाऱ्याने तो ट्रायचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. त्याचा मोबाईल नंबरचा वापर बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी वापरले जात असल्याचे भासवले. तसेच 68 मिलियनचा घोटाळा झाल्याच्या भूलथापा मारल्या.
असा केला बनाव
ठगाने तिला तिच्या विरोधात केस सुरू असल्याचे सांगून तिच्याकडे बँक खात्याची माहिती विचारली. महिलेने नकार दिल्यावर तपास अधिकारी असल्याचे सांगून ऑनलाइन चौकशी सुरू असल्याचे भासवले. ठगाने तिच्या केसची व्हिडीओ कॉलवरून सुनावणी होणार असून तिला पांढरे कपडे घालण्यास सांगितले. काही वेळाने ठगाने तिला व्हिडीओ कॉल केला. न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे तिला सांगण्यात आले.
बनावट न्यायाधीशाने महिलेला शिक्षा सुनावल्याने ती घाबरली. शिक्षा सुनावल्यानंतर दोघांनी तिला फोन केला. शिक्षेतून बाहेर काढू असे तिला सांगितले. ठगाने महिलेकडून बँक खात्याची माहिती घेतली. शिक्षेतून सुटका मिळावी यासाठी ठगाने तिच्याकडून 4 कोटी 82 लाख रुपये उकळले.