
शेतात काम करीत असताना सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने एका आदिवासी महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. माथेरानच्या कुशीत वसलेल्या आसलवाडी गावात जायला रस्ता नाही त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी सर्पदंश झालेल्या महिलेला झोळी करून जुमापट्टी गावात आणले. त्यानंतर तिला नेरुळ येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र गावाला रस्ता नसल्यामुळे तिच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. सरकारी अनास्थेचा आणखी एक बळी गेल्यामुळे आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कर्जत तालुक्यातील आसलवाडी येथील विठाबाई सांबरी या आपल्या शेतात भात लावणीच्या कामासाठी गेल्या होत्या. भात लावणी सुरू असताना त्यांना सर्पदंश झाला. त्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली. मात्र रस्ता नसल्याने धो धो पावसात झोळीत टाकून विठाबाई यांना जुमापट्टीपर्यंत आणले.
तेथून वाहनाने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र विठाबाई यांची प्रकृती खालावत असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना पुढे घेऊन जाण्यास सांगितले. ग्रामस्थ त्यांना पुढील उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
आंदोलनाची दखल घेतली नाही
13 आदिवासी वाड्यांसाठी रस्ता तयार व्हावा म्हणून आजवर आदिवासी समाजाकडून आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको करण्यात आले, परंतु शासन गोरगरीब जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. या सर्वच वाड्यांना रस्त्याने जोडण्यात यावे अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.