वरळी येथे महिलेला चिरडल्याची घटना ताजी असतानाच अशीच घटना मंगळवारी रात्री मालाड येथे घडली. भरधाव वेगातील गाडीने महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. सहाना जावेद इकबाल काझी असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून चालकाला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
सहाना ही पती आणि दोन मुलासह मालाडच्या ऑरीस टॉवर परिसरात राहत होती. तिचा पती पालिकेत घन कचरा विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. तर सहाना ही मेहेंदी क्लासला जायची. मंगळवारी सहाना ही मेहेंदी क्लासवरून पायी घरी जात होती. तेवढ्यात भरधाव वेगात असलेल्या गाडीने सहानाला धडक दिली. धडक दिल्यानंतर तिला दुभाजकापर्यंत फरफटत नेले. त्यानंतर त्याने गाडी थांबवली नाही.
अपघाताचा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. स्थानिकांनी सहानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सहानाला मृत घोषित केले. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी कार चालकाला पकडून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या गाडीची मोडतोडदेखील केली. त्या कारचा चालकाचे नाव अनुज सिन्हा आहे. तो मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असल्याचे समजते. स्थानिकांनी केलेल्या मारहाणीत तो देखील जखमी झाला आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते का हे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
दोन चिमुकलींचे मातृछत्र हरपले
अपघातात मृत्यू झालेल्या सहाना हिला दोन लहान मुली आहेत. कारचालक अनुजने जिवाची मुंबई करण्यासाठी आलिशान गाडी बेदरकारपणे चालवली. या अपघातात सहानाचा हकनाक बळी गेला आणि दोन लहान मुलींचे मातृछत्र हरपले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.