केडीएमसीच्या दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा, उपचारात हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या सुवर्णा सरोदे (26, रा. मोठागाव, डोंबिवली) या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर पालिकेने ठेवला आहे. डॉ. संगीता पाटील आणि डॉ. मीनाक्षी केंद्रे अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

सुवर्णा सरोदे यांना प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळेच गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याचा संताप सर्वत्र व्यक्त होत होता. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एमके फॅसिलिटीस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या बाह्यस्रोत संस्थेला पालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आमदार गोपाळराव मते आणि आमदार मनोज शिंदे यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी मृत्यूची चौकशी करण्यासाठी उपायुक्त प्रसाद बोरकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र समिती नेमली होती.

निष्काळजीपणावर शिक्कामोर्तब 

आयुक्तांनी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल येईपर्यंत दोन्ही डॉक्टरांना कामावरून कमी करावे अशी शिफारस करण्यात आली.