
पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामाला असलेल्या तरुणीचा वयाच्या 26 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर आता मुलीच्या आईने कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. मुलीचा मृत्यू कंपनीतील अतिताणाने झाला असल्याचा आरोप केला आहे. त्य़ासंदर्भात मुलीच्या आईने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहीले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अॅना सेबेस्टिअन पेरायिल असे हृदयविकाराने मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अॅना सेबेस्टियनची आई अनिता ऑगस्टीन यांनी मुलगी काम करत असलेल्या ई.वाय.इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मेमानी यांना एक पत्र लिहीले आहे. त्या पत्रात त्यांनी अनेक आरोप केले आहेत. या पत्रात अनिता यांनी मुलीला न्याय मिळायला हवा. या सोबत कंपनीत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचाही उल्लेख केला आहे.
अॅना ही पुण्याच्या ई.वाय.इंडिया कंपनीत सीए म्हणून काम करत होती. तिच्या आईने लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, अॅनावर कामाचा ताण होता. ती गेल्या अनेक दिवसांपासून कामाच्या तणावात होती आणि त्या तणावामुळेच माझ्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला. मार्च 2024 मध्ये अॅनाने या कंपनीत रूजू झाली होती आणि अवघ्या चार महिन्यांत तिचे निधन झाले. तिच्या आईच्या पत्राची सगळीकडे चर्चा होत आहे.
अनिता यांनी पत्रात लिहीले आहे की, मी एक दु:खी आणि पिडीत आई म्हणून हे पत्र लिहीत आहे. कामाच्या अतिताणामुळे मी माझी मुलगी गमावली. 19 मार्च 2024 रोजी पुण्याच्या ई.वाय.इंडिया कंपनीत सीए म्हणून अॅना रूजू झाली. मात्र 20 जुलै रोजी अवघ्या चार महिन्यांत माझ्या मुलीचे निधन झाले. नवीन वातावरण, कामाचे ओझे आणि कामाचे जास्त तास यामुळे ती प्रचंड थकली होती. यामुळे तिला चिंता, अपुरी झोप आणि तणाव वाढला होता. कामाच्या अतिताणामुळे ती खचली होती. मात्र मेहनत आणि चिकाटी धरून ती काम करत होती. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याच गोष्टीचा फायदा घेत तिच्यावर आणखी ताण दिला. ज्या टीममध्ये ती काम करत होती, तिथे कामाचे खूप प्रेशर होते. त्यामुळे अनेकांनी राजीनामा दिला होता. अॅनाचे टीम लिडर तिला प्रोत्साहन देतच होते, पण ते आणखी कामही देऊ लागले. रात्री उशीरापर्यंत ती काम करायची. सुट्टीच्या दिवशीही तिला काम दिले जात होते. पण ज्यांनी तिला काम दिले होते, ते तिच्या अंत्ययात्रेलाही आले नाही.
अॅनाला 6 जुलैला अचानक छातीत दुखू लागले. तिला तत्काळ पुण्यातील एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिची ईसीजी करून तपासणी केली आणि औषधं देऊन तिला घरी पाठवण्यात आले. मात्र कामाचा ताण जास्त असल्याने तिची झोप अपुरी असल्याचे डॉक्टरांनी तिच्या आई-वडिलांना सांगितले. तिला आरामाची गरज असल्याचे सांगूनही ती रुग्णालयातून थेट ऑफिसमध्ये गेली आणि रात्री उशीरा कामावरुन आली. मात्र त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. असे असताना ती दोन आठवडे काम करत राहिली आणि तिचा मृत्यू झाला.
अॅनाच्या आईने लिहीलेल्या पत्राला आता कपंनीनेही उत्तर दिले आहे. अॅना ही कंपनीची चांगली कर्मचारी होती. तिच्या जाण्याने तिच्या कुटुंबियांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीची भरपाई कोणत्याच पद्धतीने होऊ शकत नाही. अशा संकटाच्यावेळी आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मदत केली आहे आणि यापुढेही करत राहू. आम्ही त्यांचे पत्र गांभिर्याने घेतले असून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देतो, असे कंपनीने म्हटले आहे.