
‘विदेशात नोकरी देतो,’ असे सांगत रजिस्ट्रेशन फी, व्हेरिफिकेशन, व्हिजा आणि इतर वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून 29 लाख 97 हजार रुपये घेत नोकरी न देता फसवणूक केली. ही घटना 26 नोव्हेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली.
हर्ष मिश्रा, शिवांश पटारिया, अविनाश मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 34 वर्षीय महिलेने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेला आरोपींनी फोनवरून संपर्क केला. महिलेचे प्रोफाइल ‘नोकरी डॉट कॉम’वर पाहिले असून, त्यांना जॉबची ऑफर असल्याचे आरोपीने सांगितले. महिलेकडून रजिस्ट्रेशनसाठी आठ हजार 500 रुपयांची मागणी केली. त्यानंतर महिलेने तिच्या वडिलांसाठी विदेशात जॉब मिळेल का? याबाबत चौकशी केली. त्यावर आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांसोबत बोलून त्यांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना यूकेमध्ये जॉब असून, त्यासाठी रजिस्ट्रेशन फी, कागदपत्रे व्हेरिफिकेशन फी, व्हिजा फी, व्हिजाचे नियम बदलले असल्याचे सांगत कन्व्हर्जन चार्जेस, कंपनीचे सिक्युरिटी डिपॉझिट, कंपनीचा आयडी तयार करण्यासाठी, इन्शुरन्ससाठी, संबंधित कंपनीतील एचआर पॅनेलमधील मेंबर बदलले असून, नवीन मेंबर पैशांची मागत असल्याचे सांगत आणखी पैशांची मागणी केली. त्यानंतर यूकेमध्ये जॉब मिळत नसून, ऑस्ट्रेलियात जॉब असल्याचे सांगून आणखी पैसे घेत 29 लाख 97 हजार 768 रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार तपास करीत आहेत.