केवायसी करणे पडले महिलेला महागात

केवायसी दंडाच्या नावाखाली ठगाने पर्सनल लोन काढून महिलेची 8 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

मालाड येथे महिला राहते. गेल्या आठवडय़ात महिलेला एका नंबरवरून पह्न आला. पह्न करणाऱ्याने तो एका खासगी बँकेतून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या खात्याची केवायसी पूर्ण झाली नसल्याचे सांगितले. जर केवायसी पूर्ण न झाल्यास साडेतीन हजार रुपये दंड आकारला जाईल असे तिला सांगितले. दंड आकारू नये म्हणून महिलेने केवायसीसाठी होकार दिला. होकार दिल्यावर ठगाने तिला एक लिंक पाठवली. त्या लिंकमध्ये एपिके फाईल होती.

ती लिंक मोबाइलमध्ये ओपन केली असता एक अॅप डाऊनलोड झाले. त्या अॅपमध्ये महिलेने तिची बँक खात्याची माहिती भरली. माहिती भरल्यावर तिच्या खात्यातून सुरुवातीला 25 हजार रुपये काढले गेले.

पैसे गेल्याचा मेसेज आल्यावर महिलेने त्या नंबरवर पह्न करून विचारणा केली तेव्हा ठगाने तिला ते पैसे पुन्हा खात्यात जमा होतील असे तिला सांगितले. हा प्रकार महिलेला संशयास्पद वाटला. तिने मोबाइलमधील मेसेज पाहिले असता तिच्या खात्यातून 75 हजार रुपये काढले गेले होते. त्यानंतर महिला दिंडोशी येथील एका खासगी बँकेत गेली. तेव्हा महिलेला तिच्या नावाने 7 लाख 55 हजार रुपयांचे पर्सनल लोन काढल्याचे समजले. फसवणूकप्रकरणी महिलेने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.