गांजा तस्करीप्रकरणी महिलेला अटक 

बँकाक येथून गांजा घेऊन आलेल्या महिलेला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर (एआययू) ने अटक केली. फिझा जावेद खान असे महिलेचे नाव आहे. तिच्याकडून 1.95 कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. फिझाला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी सीमा शुल्क विभागाने घेतली आहे. बँकॉक येथून एक महिला गांजा घेऊन येणार असल्याची माहिती एआययूच्या पथकाला मिळाली. आज पहाटे फिझा ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली.

तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिच्याकडील साहित्याची झडती घेतली. तिच्या बॅगेत कपडे आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत हिरव्या रंगाची वस्तू आढळून आली. त्या वस्तूची तपासणी केली असता तो गांजा असल्याचे उघड झाले. तो 4273 ग्रॅम गांजा होता. गांजा तस्करीप्रकरणी एआययूने फिझाविरोधात गुन्हा नोंद केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 1.95 कोटी रुपये इतकी आहे. तिला गांजा तस्करीच्या मोबदल्यात काही रक्कम मिळाली होती. तिला तो गांजा कोणी दिला होता याचा तपास एआययू करत आहेत.