छत्री लागल्याच्या रागातून महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसला

एका महिलेची छत्री लागली म्हणून रागाच्या भरात तिला गंभीर इजा करणाऱ्या तरुणाला शोधून पोलिसांना अखेर बेड्या ठोकल्या. अनिता पाटकर या शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वरळीच्या जे. के. कपूर मार्गाने जात होत्या. दुपारचे टळटळीत ऊन टाळण्याकरिता त्यांनी छत्री घेतली होती. रस्त्यातून जात असताना एका 35 वर्षीय तरुणाला छत्री लागली. याचा राग अनावर होत या तरुणाने आपल्या हातातील काचेचा तुकडा अनिता यांच्या पाठीत खुपसला. यात अनिता गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर त्या तरुणाने तेथून पळ काढला. वरळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. वरळी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करून सचिन आवसरमोल या तरुणाला वरळीच्या प्रेमनगर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.