हृदयातील महाधमनी फुटण्याची भीती, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली असून 50 वर्षीय रुग्णाला जीवदान मिळाले आहे. हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथकाने जीवघेण्या ऑर्टीक म्हणजे हृदयातून बाहेर येणाऱ्या सर्वात मोठ्या धमनीतील दूरवस्थेवर उपचार करण्यासाठी ‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ (FET) या तंत्रज्ञानाचा वापर करुन उल्लेखनीय कामगिरी केली.

हृदयातून सुरू होणाऱ्या सर्वात मोठ्या धमनीला आलेला फुगवटा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत असलेले 50 वर्षीय रुग्ण रिझवान सय्यद वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथे उपचारासाठी आले होते. रुग्णाची स्थिती आणि लक्षणे पाहता सय्यद रिझवान यांच्या हृदयातील महाधमनी फुटण्याची आणि उपचार न केल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. रुग्णाची परिस्थिती आणि तातडीने उपचाराची गरज ओळखून डॉ. गुलशन रोहरा यांनी डॉ. विशाल पिंगळे आणि वैद्यकीय पथकासह रिझवान सय्यद यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईत क्वचितच वापरल्या जाणाऱ्या ‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ (FET) तंत्रज्ञानाची निवड केली. या तंत्रज्ञानाच्या मदतीने रिझवान सय्यद यांच्यावरील एफईटी शस्त्रक्रिया सुमारे 11 तास चालली. वैद्यकीय पथकाने अचूकतेने आणि कौशल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर मागील काही दिवसांमध्ये रुग्णामध्ये कोणतीही न्युरोलॉजिकल गुंतागुंत किंवा समस्या आढळून आलेली नाही.