रेल्वे पुणे विभागात मे महिन्यात सातारा, मिरज, कराड, सांगली, कोल्हापूर, जेजुरी, पुणे यांसह विविध स्थानकांत तिकीट तपासणीत सुमारे 24 हजार 511 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 1 कोटी 96 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पुणे विभागात मे महिन्यात विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान बुक न करता तसेच घेऊन जाणे याबाबत रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने कारवाई करून 2 कोटी 48 लाख रुपयांचा दंड वसूल केला. तसेच 8 हजार 474 प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी 51 लाख 8 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सामान बुक न करता घेऊन जाणाऱ्या 167 प्रकाशांकडून 35 हजार 295 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरके यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशाप्रकारची तिकीट तपासणी मोहीम रेल्वेच्या विविध स्थानकांसह एक्प्रेस व अन्य रेल्वे गाडय़ांमध्ये सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी रेल्वेमधून प्रवास करताना तिकीट घेऊनच प्रवास करावा; अन्यथा रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.