तीन महिने गाडी चालवायची नाही; हायकोर्टाचे तरुणाला आदेश, लायसन्स नसताना हेल्मेट न घालता चालवली होती बाईक

17 वर्षांचा असताना हेल्मेट न घालता बाईक चालवणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. पुढील सुमारे तीन महिने कोणतीच गाडी चालवायची नाही, असे सक्त आदेश न्यायालयाने या तरुणाला दिले आहेत.

लायसन्स नसताना हेल्मेट न घातल्याप्रकरणी या तरुणाविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या तरुणाने याचिका केली होती. न्या. रवींद्र घुगे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 15 एप्रिल 2025 पर्यंत दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व इलेक्ट्रिक वाहन चालवायचे नाही, असे आदेश देत या तरुणाविरोधातील गुन्हा न्यायालयाने रद्द केला.

महापालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्याचे आदेश

मालाड येथील एस. के. पाटील महापालिका रुग्णालयात या तरुणाने सेवा द्यावी. 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी व 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 या काळात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही सेवा द्यावी. सेवेचा तपशील रुग्णालयाने तरुणाला सांगावा असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

लायसन्स पोलिसांकडे जमा करावे

तरुणाने त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ओशिवरा पोलिसांकडे जमा करावे. पोलिसांनी 15 एप्रिलला तरुणाला लायसन्स परत करावे. त्याआधी लायसन्स लागल्यास त्याची पावती पोलिसांकडून घ्यावी, असेही न्यायालयाने तरुणाला सांगितले आहे.

प्राणी संघटनेला 25 हजार देण्याचे आदेश

गुन्हा रद्द करण्यासाठी आईने 25 हजार रुपये भरण्याची तयारी दर्शवली. इन डिफेन्स ऑफ ऑनिमल या  संघटनेला 25 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने तरुणाच्या आईला दिले.

काय आहे प्रकरण

हुशाद बच्छा असे या तरुणाचे नाव आहे. 21 ऑक्टोबर 2017 रोजी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. आईला सोबत घेऊन बाईक चालवत असताना पोलिसांनी त्याला अडवले. त्यावेळी तो 17 वर्षांचा होता. त्यामुळे त्याच्याकडे लायसन्स नव्हते. त्याने हेल्मेट घातले नव्हते. त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याच्या आईने रागात पोलिसाच्या शर्टाचे बटण तोडले. तरुणाविरोधात लायसन्स नसल्याचा व हेल्मेट न घालता बाईक चालवल्याच गुन्हा नोंदवण्यात आला. आईविरोधातही गुह्याची नोंद करण्यात आली. हा गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका करण्यात आली होती.