झोपडपट्टीवासीयांना घरे द्या, गॅरंटी देतो निवडणूक लढवणार नाही! अरविंद केजरीवाल यांचे अमित शहा यांना आव्हान

दिल्लीतील सर्व झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे बांधून द्या. मी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार नाही याची गॅरंटी देतो, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले.

दिल्लीतील शकूर बस्ती येथे ते बोलत होते. दिल्ली विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे भाजपवाल्यांचे झोपडपट्टीवासीयांबद्दलचे प्रेम वाढत चालले आहे, असा टोला लगावतानाच मोदी सरकारने अनेक ठिकाणच्या झोपड्या तोडल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.

शहा यांनी एका कार्यक्रमात प्रत्येक झोपडीधारकाला भाजपा पक्के घरे देईल असे म्हटले होते, तोच धागा पकडून केजरीवाल यानी आज मोदी सरकारला कोंडीत पकडले.

शहांनी झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल केली

शहांनी खोटे बोलून झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल केली. शहा म्हणाले होते, जिथे झोपडपट्टी असते तिथे घर असते. पण, ते हे सांगत नाहीत की, जिथे झोपडपट्टी असते तिथेच त्यांना त्यांच्या मित्रांची आणि बांधकाम व्यावसायिकांची घरे बनवायची असतात. त्यांचा मित्र कोण आहे हे सगळय़ांना माहीत आहे, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.

भाजप खासदारांच्या पत्त्यावर 40 नव्या मतदार ओळखपत्रांसाठी अर्ज

डिसेंबर आणि जानेवारीदरम्यान भाजपच्या अनेक मंत्री आणि खासदारांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल 40 नवीन मतदार ओळखपत्रांसाठी अर्ज करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे. अचानक इतके लोक भाजप खासदारांच्या घरांमध्ये कसे राहायला लागले. एक खोली असलेल्या झोपडीतून 30 नवीन मतदार ओळखपत्रे बनवण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत, तर एका छोटय़ाशा दुकानातून 40 नवीन ओळखपत्रे बनवण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. हे लोक कोण आहेत, असे प्रश्नही केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत.