उद्योगपती गौतम अदानींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घोटाळ्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे ही विरोधकांची मागणी, तर अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी काँगेसच्या संबंधित संस्थांना केलेल्या कथित मदतीबद्दल सभागृहात चर्चा व्हावी ही सत्ताधाऱयांनी केलेली मागणी. सत्ताधारी व विरोधकांमध्ये दोन उद्योगपतींवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत चांगलीच जुंपल्याने आजही संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहांत सातत्याने गदारोळ झाल्यावर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधकांनी अदानी, तर सत्ताधाऱयांनी सोरोसच्या मुद्दय़ावरून घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी तातडीने कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब केले. बारानंतरही सभागृहातला गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज दुपारी दोन व त्यानंतर तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तीननंतरही सभागृहातील गोंधळ थांबत नाही हे पाहून तालिका सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
राज्यसभेतही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज सुरू होताच भाजपचे दिनेश शर्मा व नीरज शेखर यांनी काँगेसचा आणि अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोसचा काय संबंध आहे व सोरोसकडून काँगेसच्या संस्थांना कशा काय देणग्या मिळाल्या, असा सवाल उपस्थित केला. त्यावरून गदारोळ शिगेला पोहोचला. सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. परिणामी कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब करावे लागले. दुपारी दोननंतर पुन्हा याच मुद्दय़ावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. अखेरीस सभापती धनखड यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.