विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार पेपरलेस

विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनानंतर आता 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाचे वैशिष्टय़ म्हणजे यंदाचे अधिवेशन पेपरलेस होणार आहे. म्हणजे दोन्ही सभागृहांतील प्रत्येक सदस्याच्या आसनासमोर डिजिटल स्क्रीन बसवण्यात आले आहेत. कामकाजाच्या क्रमापासून प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना आता कागदावर नव्हे तर लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसतील.

सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची तारीख अधिकृतपणे जाहीर होईल. विधिमंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार 16 ते 21 डिसेंबर या काळात अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नागपूरच्या विधान भवनात अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा सदस्यांसाठी नवी आकर्षक आसन व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन आसन व्यवस्था व नव्याने टेबल तयार करण्यात आली आहे. अधिवेशनाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विधान परिषद आणि विधानसभा सभागृहातील प्रत्येक आमदाराच्या टेबलावर डिजिलट स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा अधिवेशनाचे कामकाज डिजिटल पद्धतीने होणार आहे. सदस्याच्या समोरील टच स्क्रीनवरच सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. नव्या संसद भवनाच्या सेंट्रल व्हिस्टा आणि केरळमधील विधिमंडळाच्या सभागृहात हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

महाविकास आघाडीची विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करणार – सुनील प्रभू

विरोधी पक्षनेता नेमता येणार नाही, असे घटनेमध्ये कुठेच म्हटलेले नाही. विरोधी पक्ष म्हणून आमचं संख्याबळ कितीही असलं तरी महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे. यासंदर्भात अध्यक्ष निर्णय घेतील, असे शिवसेना प्रतोद सुनील प्रभू माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ईव्हीएमच्या मुद्दय़ावरून मारकडवाडीत लोकांची धरपकड सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. ईव्हीएमच्या निकालाबाबत जनतेत उत्साह नाही. सर्वांच्या मनात निकालाबात शंका आहे. मारकडवाडी घटनेचा निषेध म्हणून आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला, असे सुनील प्रभू म्हणाले.