माथेरान-महाबळेश्वरपेक्षा निफाड थंडा थंडा कूल कूल, नाशिक जिल्हा गारठला; 8.9 अंश सेल्सिअसची नोंद

उत्तर हिंदुस्थानातून वाहणाऱया वेगवान वाऱयामुळे नाशिक जिह्यात थंडीची लाट आली आहे. निफाडजवळील  कुंदेवाडी येथे आज या मोसमातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले, तर नाशिकचाही पारा 8.9 अंशांवर घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये 11.5 अंश सेल्सिअस तर माथेरानमध्ये 14.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

मागील वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस, गारपीटीने अक्षरशः थैमान घातले होते, त्यामुळे थंडी गायब झालेली होती, तेव्हा 30 नोव्हेंबरला नाशिकमध्ये किमान 17.9 आणि कमाल 29.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यातुलनेत यावर्षी जिह्याच्या तापमानात नोव्हेंबरमध्येच मोठी घट झालेली आहे. तेरा दिवसांपासून जिह्यात थंडी जाणवत आहे. सकाळी प्रचंड थंडी, धुके असे वातावरण कायम आहे.

निफाडजवळील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात कमाल तापमान कालइतकेच आज 26 होते, केवळ किमान तापमानात 3.1 अंशांनी घट झाली. शुक्रवारी ते 10.1, तर आज 7 अंशांवर घसरल्याने कमालीचा गारठा होता. नाशिकमध्ये काल किमान तापमान 10.6, तर आज 8.9 इतके नोंदवले गेले आहे. थंडगार वाऱयामुळे दिवसाही वातावरणात चांगलीच थंडी जाणवत आहे.

द्राक्ष उत्पादक हवालदिल

निफाड तालुक्यात शनिवारी किमान तापमान 7 अंशांवर घसरले होते. मागील वर्षी गारपीटीसह अवकाळीने द्राक्षबागा उद्ध्वस्त केल्या, त्या संकटातून अजूनही उत्पादक सावरलेले नाहीत. यावर्षीच्या हंगामाकडून त्यांना अपेक्षा होती. मात्र, परतीच्या लांबलेल्या पावसापासूनच संकटांची मालिका सुरू झाली. आता अतिथंडीमुळे द्राक्षमण्यांची फुगवण थांबण्याची, परिपक्व मण्यांना तडे जाण्याची भीती आहे, त्यामुळे उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.