मुंबई-ठाण्यासह राज्यभरात गुरुवारी किमान तापमानात मोठी घसरण झाली आणि नागरिकांना गुलाबी थंडीची चाहूल लागली. मुंबईत सांताक्रुझमध्ये पारा 18 अंशांपर्यंत खाली आला. तापमानात सरासरीपेक्षा तीन अंशांची घट झाली. त्यामुळे गेले अनेक दिवस थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना हुडहुडी भरली. राज्याच्या बहुतांश भागांत 11 ते 12 अंश किमान तापमान नोंद झाले. ग्रामीण भागात गारठा वाढला आहे.
नोव्हेंबर संपत आला तरी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात थंडी दाखल झालेली नाही. पूर्वेकडील वारे सक्रिय राहिल्याने थंडीची वाट अडली. त्यामुळे मागील आठवडाभर किमान तापमान 24 अंशांच्या आसपास राहिले होते. गुरुवारी सकाळी मात्र तापमानात अचानक मोठी घट झाली आणि मुंबईकर-ठाणेकरांनी हुडहुडी अनुभवली. सांताक्रुझमध्ये कमाल तापमानही खाली घसरले. ठाण्याच्या तापमानात 23 अंशांपर्यंत घट झाली. शेजारच्या पालघर जिह्यातही थंडीची तीव्रता वाढली आहे. डहाणूमध्ये 19 अंश किमान तापमान नोंद झाले. राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागांत येत्या दिवसांत थंडीची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर 11 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान
महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱया महाबळेश्वर- पाचगणीचा पारा घसरला असून 11 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आल्याने थंडी वाढली आहे. पहाटेपासूनच अंगाला झोंबणारे वारे वाहत असल्याने सकाळी नऊपर्यंत अंगातून थंडी जात नाही. शहरासह घनदाट झाडी आणि पर्वतरांगांवर पहाटे व संध्याकाळी दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. विशेषकरून महाबळेश्वर शहरात पहाटे 11 ते 12 अंश सेल्सिअसचे तापमान आढळून आले आहे. आता गुलाबी थंडीची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
कुठे.. किती तापमान
सांताक्रुझ – 18 अंश
महाबळेश्वर – 11 अंश
डहाणू – 19 अंश
नाशिक – 12 अंश
मालेगाव – 14 अंश
पुणे – 12 अंश
उदगीर – 13 अंश