संक्रमण शिबिराच्या खुराड्यातून सुटका होणार, म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील विजेत्यांना आज देकारपत्र मिळणार

म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील विजेत्यांची सात महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. विजेत्यांना उद्या, मंगळवारी दुपारी 12 वाजता म्हाडा वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते देकारपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.

गेल्या 30 ते 40 वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱया रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने 28 डिसेंबरला मास्टर लिस्टवरील 265 भाडेकरू आणि रहिवाशांची पहिल्यांदाच संगणकीय सोडत काढली. काही अपात्र अर्जदारांनी बोगस कागदपत्रे सादर करून म्हाडाची दिशाभूल केल्याची तक्रार म्हाडाला प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर सोडतीमधील सर्वच विजेत्यांची पुन्हा पात्रता पडताळणी करण्याचा निर्णय म्हाडाच्या उपाध्यक्षांनी घेतला. त्यामुळे सात महिने झाले तरी विजेते घराच्या प्रतीक्षेत आहेत.

53 अर्जांची अजूनही पडताळणी बाकी  

विजेत्यांच्या पात्रता पडताळणीत 265 पैकी 212 विजेते पात्र ठरले आहेत. त्यापैकी ज्या 158 विजेत्यांनी स्वीकृतीपत्र सादर केले आहे, अशा विजेत्यांना मंगळवारी देकारपत्र देण्यात येईल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच उर्वरित 53 अर्जांची अजूनही पडताळणी बाकी असून पात्र ठरल्यावर संबंधित विजेत्यांना देकारपत्र देण्यात येईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.