Wimbledon 2024 : गतविजेतीला बिगरमानांकिताचा धक्का; जेसिका बोजास मनेरोचा पराक्रम, मार्केटा वोंद्रोसोव्हा सलामीलाच बाद

स्पेनची 21 वर्षीय बिगरमानांकित जेसिका बोजास मनेरोने आज आपल्या कारकीर्दीतील सनसनाटी आणि संस्मरणीय कामगिरी केली. तिने गतविजेत्या मार्केटा वोंद्रोसोव्हाचा 6-4, 6-2 असा सरळ सेट्समध्ये पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. विम्बल्डन टेनिसच्या इतिहासात तब्बल तीन दशकांनंतर प्रथमच वर्तमान विजेत्या महिला टेनिसपटूवर पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की आली.

टेनिस विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेला सुरुवात होताच धक्कादायक निकालांनाही हजेरी लावली. गेल्यावर्षी बिगरमानांकन असतानाही विम्बल्डनच्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावण्याची किमया करून मार्केटाने अनोखा इतिहास रचला होता. याआधी एकही बिगरमानांकित खेळाडू विजेती ठरली नव्हती. आता तिच्याच नावावर आणखी एक इतिहास नोंदवला जाणार आहे. 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1994 साली टेनिससम्राज्ञी स्टेफी ग्राफला बिगरमानांकित लॉरी मॅकनिलने नमवण्याचा पराक्रम केला होता. यंदा वोंद्रोसोव्हाला सहावे मानांकन देण्यात आले होते. या डावखुऱ्या टेनिसपटूने 2019 च्या फ्रेंच ओपनचे उपविजेतेपद पटकावले होते तर तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही रौप्य पदक जिंकले होते, पण यावेळी हिरवळीवर तिला आपली चमकदार कामगिरी करताच आली नाही.

हा माझ्या आयुष्यातील, कारकीर्दीतील सर्वोच्च क्षणांपैकी एक आहे. हे आश्चर्यजनक असल्याचेही जेसिका म्हणाली. वोंद्रोसोव्हा सामन्याच्या सुरुवातीलाच दबावात दिसली. तिने पहिल्या गेममध्येच तीन वेळा दुहेरी चुका केल्या. 66 मिनिटे चाललेल्या सामन्यात तिने तब्बल 7 दुहेरी तर 28 सामान्य चुका केल्या. त्यामुळे सामन्यावर जेसिकाने सहजपणे पकड केली.

जोकोविच, रायबकिनाचे विजय

आपल्या विक्रमी 25 व्या जेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी विम्बल्डनच्या हिरवळीवर पुन्हा एकदा उतरलेल्या नोवाक जोकोविचने विट कोप्रिवाचा 6-1, 6-2, 6-2 असा सहज पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तसेच चौथ्या मानांकित एलिना रायबकिनाने एलिना ग्रॅबिएला रुसला 6-3, 6-1 असे नमवले. पाचव्या मानांकित अमेरिकन जेसिका पेगुलाने आपल्याच देशाच्या अॅशलिन क्रुगरचा 6-2, 6-0 असा फडशा पाडला