जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन पैठणच्या समस्या मार्गी लावणार! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन

पैठण विधानसभा मतदारसंघातील अनेक लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित आहेत. सार्वजनिक नागरी सुविधांची वानवा आहे. या सर्वांची मी गांभीर्याने दखल घेतली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन महिनाभरात बहुतांश प्रकरणे मार्गी लावली जातील असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते डॉ. अंबादास दानवे यांनी केले. शेतकरी व नागरिकांच्या समस्या, अडिअडचणी व उपाययोजना’ या विषयावर त्यांनी चिते पिंपळगाव, आडुळ, पाचोड, विहामांडवा, बिडकीन व चितेगाव येथे बैठका घेतल्या. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी व विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पैठण येथील हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत सौरऊर्जा योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी, पाणंद रस्ते, स्मशानभूमीच्या जागेचे वाद, विद्युत डी.पी. देण्याबाबत महावितरण कंपनीची अनास्था, अतिवृष्टीची प्रलंबित नुकसान भरपाई, अतिक्रमणे व सत्ताधारी राजकीय हस्तक्षेपामुळे होणारा त्रास याबाबत शेतकऱ्यांनी लेखी निवेदने दिली. तोंडी तक्रारी सादर केल्या. या सर्वांची नोंद घेतल्यावर विरोधी पक्षनेते डॉ. अंबादास दानवे यांनी ग्रामस्थ व शेतकरी लाभार्थ्यांना आश्वस्थ केले. यावेळी त्यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक कुणालाही त्रास देऊ नये. नियमात बसणाऱ्या कामांसाठी हेलपाटे मारायला लाऊ नका. अन्यथा कायद्याला धरुनच कारवाई केली जाई असा इशारा त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्यासह सर्वच विभागप्रमुखांची लवकरच बैठक घेऊन महिनाभरात या समस्यांचा निपटारा करण्यात येईल. असेही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, माजी तालुकाप्रमुख तथा जि.प.चे माजी सभापती डॉ. सुनील शिंदे, शहरप्रमुख अजय परळकर, विधानसभा संघटक सोमनाथ जाधव, उपतालुकाप्रमुख ? ड किशोर वैद्य, माजी नगरसेवक कमलाकर वानोळे, पुष्पा वानोळे, आप्पासाहेब गायकवाड, प्रा. पी. आर. थोटे, राजू परदेशी, शंकर निवारे, आतिष गायकवाड, निवृत्ती बोबडे, संभाजी अत्रे, आकाश रावस, सुनील काकडे व कल्याण म्हस्के उपस्थित होते. गटविकास अधिकारी मनोरमा
गायकवाड व नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी यांनी समस्यांबाबत तांत्रिक माहिती दिली.

न.प. मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांची बैठकीकडे पाठ
पैठण नगर परिषदेच्या नवीन मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे कार्यालयात असताना बैठकीला अनुपस्थित होत्या. बदली झालेले मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या कार्यकाळात शहर बकाल बनले आहे. सध्या या तीर्थक्षेत्रातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. अतिक्रमणांना धरबंध राहीलेला नाही. विकास कामांचा दर्जा व गुणवत्तेवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. अशा अनेक तक्रारी घेऊन नागरीक मोठ्या प्रमाणावर आले होते. विशेषतः पाण्याची समस्या मांडण्यासाठी महिलाही आल्या होत्या. मात्र मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे बैठकीकडे फिरकल्याच नसल्याने तक्रारदारांचा हिरमोड झाला.