
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मुसलमानांना कर्नाटकमध्ये 4 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी संविधानात बदल करण्यात येईल, असे शिवकुमार म्हणाल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र हा दावा खरा ठरल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हानच शिवकुमार यांनी भाजपला दिले आहे.
मी अनुभवी नेता असून गेल्या 36 वर्षापासून विधानसभेत आहे. मी संविधान बदलण्याचे विधान कधीही केले नाही. मी इतकेच म्हणालो की, वेगवेगळ्या निर्णयानंतर बरेच बदल होतात आणि जे काही आरक्षण दिले आहे ते मागासवर्गीयांसाठीच येते. मात्र माझ्या विधानाची मोडतोड करून ते मांडण्यात आले, असे शिवकुमार म्हणाले. तसेच या मुद्द्यावरून विशेषाधिकार प्रस्तावही मांडण्याचा विचार सुरू असून याबाबत मी माझी लढाई लढण्यास तयार आहे, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
भारतीय जनता पक्षा मुलाखतीतील सत्य आणि माझी राजकीय भूमिका पचवू शकत नाही. मी संविधान बदलणार असे कुठे म्हटले आहे? जर मी तसे म्हटले असते तर मी ते स्वीकारले असते, असेही शिवकुमार म्हणाले.
भाजपचे लोकच संविधान बदलण्याची भाषा करत असतात. आम्ही हे संविधान आणले असून त्याचे रक्षणही करत आहोत. त्यामुळे माझ्यावरील संविधान बदलणार हा आरोप सिद्ध करून दाखवल्यास राजकारण सोडून देईन. भाजप हे आव्हान स्वीकारेल का? असा सवालही शिवकुमार यांनी केला.
नितीशकुमार यांच्या मानसिक आरोग्याचे मेडिकल बुलेटिन जारी करा, प्रशांत किशोर यांची आग्रही मागणी
भाजपचा आरोप
शिवकुमार यांच्या कथित विधानानंतर भाजपने मंगळवारी राज्यभरात निदर्शनं केली. केंद्रीय मंत्री किरेन रीजिजू यांनी संसदेही हा मुद्दा उपस्थित केला. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी घटनेमध्ये बदल करण्याचे विधान अस्वीकार्य आहे. काँग्रेसने यावर स्पष्टीकरण देऊन शिवकुमार यांना पदावरून हटवावेस अशी मागणी त्यांनी केली.