राजकारणात सक्रिय राहून पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार, निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवार यांचा पूर्णविराम

भविष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. पण राजकारणात सक्रिय राहून पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असे म्हणत शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

एका मुलाखातीत बोलताना शरद पवार म्हणाले की, गेली अनेक वर्ष मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर मी राज्यसभेचीही निवडणूक लढवणार नाही. असं असले तरीही मी राजकारणात सक्रिय राहीन आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष वाढवीन असे शरद पवार म्हणाले.

आम्हाला ईडीपासून सुटका मिळावी म्हणून भाजपसोबत हातमिळवणी केली असे विधान अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले होते. त्यावर शरद पवार म्हणाले की, हीच गोष्ट मी अनेक दिवसांपासून सांगतोय. हे फक्त महाराष्ट्रातच होत नाहिये तर देशातील अनेक राज्यात होताना दिसतंय. इतर नेत्यांनीही ही बाब बोलून दाखवली आहे असेही पवार म्हणाले.