सदस्य वाढवा नाहीतर निधी मिळणार नाही! उदय सामंत यांची मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी

मिंधे गटाचे सदस्य वाढवा अन्यथा विकासकामांना निधी मागायला येऊ नका, अशी दमबाजी मिंधे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना केली. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

कोकणात आपली ताकद वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटामध्ये चढाओढ लागली आहे. त्यासाठी दबावतंत्राचा वापर करतानाच सर्वसामान्यांपासून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाही धमकावले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर विकास निधी मिळणार नाही, अशी उघड धमकी भाजपा नेते व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणातील लोकांना दिली होती. त्यावरून जोरदार टीकाही झाली होती.

उदय सामंत यांनीही नितेश राणे यांची री ओढत कोकणातील कार्यकर्त्यांना धमकावल्याचे समोर आले आहे. रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात मिंधे गटाच्या जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य नोंदणी मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना उदय सामंत यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीवरून चांगलेच धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत मिंधे गटाचे सदस्य वाढले पाहिजेत अन्यथा निधी मिळेल, असा विचारच करू नका, असा दम त्यांनी पदाधिकाऱ्यांना भरल्याची माहिती आहे.

रस्त्यांची कामे बाजूला ठेवा, सदस्य नोंदणी करा
पालकमंत्र्यांना वेठीस धरून रस्त्यांची कामे मिळवलात ना मग आता सदस्य वाढवण्याचेही काम करा. त्यासाठी रस्त्यांची कामे बाजूला ठेवा आणि सदस्य नोंदणीच्या कामासाठी वेळ द्या, नाहीतर पुन्हा निधी मिळेल याचा विचारच करू नका, असे उदय सामंत यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले. रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली या तालुक्यांमध्ये मिंधे गटाची सदस्य संख्या नगण्य असल्यामुळेच सामंत संतापल्याचे सांगितले जाते