![crime news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/crime-news-696x447.jpg)
बिहारच्या बेतिया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांना पत्नीने विरोध केल्याने तिच्या हत्येचा कट रचला. नवऱ्याने नेपाळहून आपल्या मित्राला बोलावून पत्नीची गोळी घालून हत्या केली. ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी 3 आरोपींना अटक केली असून एकजण फरार आहे.
ही घटना बेतियाच्या बलथर येथील सडकिया टोला गावची आहे. रिझवाना खातून असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मुमताज गद्दी याचे वर्षभरापासून एका महिलेसोबत विवाहबाह्य संबध होते, ज्याची भनक त्याच्या पत्नीला लागली होती. त्यावरुन पत्नीने जाब विचारला असता दोघामध्ये सततची भांडणे सुरु झाली होती. सातत्याने पत्नी त्याच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध करत असल्याने मुमताजने तिचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने आपल्या नेपाळमध्ये राहत असलेल्या मित्राला बोलावून 6 फेब्रुवारी रोजी रात्री 1 च्या सुमारास हत्या केली.
पोलिस अधीक्षक डॉ. शौर्य सुमन यांनी सांगितले की, हत्येच्या रात्री मुमताज शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडला. दरम्यान आधीच वाट पाहत असलेल्या शूटरने रिझवानावर गोळी झाडली. गोळी लागताच ती जमिनीवर पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांनी घटनेचा तपास केला, दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या जबाबावरुन त्यांना संशयास्पद वाटले. त्यानंतर पोलिसांनी संशयाआधारे महिलेचा पती मुमताज गद्दी याला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुमताज आणि त्याच्या दोन भावांना अटक केली. हत्या करणाला मुमताजचा नेपाळी मित्र सध्या फरार असून पोलीसांनी तपास सुरु केला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.