लग्नानंतर दोन आठवड्यातच पतीची सुपारी देऊन काढला काटा, पत्नी आणि प्रियकराला अटक

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुस्कान रस्तोगीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. त्याच प्रमाणे एका पत्नीने प्रियकरासोबत पतीची सुपारी दिली होती. पतीचा मृत्यू झाल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की प्रगती यादव या तरुणीचे दिलीप यादव या तरुणासोबत 5 मार्च रोजी लग्न झाले होते. प्रगतीचे अनुराग यादव सोबत गेली चार वर्ष प्रेमसंबंध होते. प्रगती आणि अनुरागच्या लग्नाला प्रगतीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न जबरदस्तीने दिलीपसोबत लावून दिले.

लग्नानंतर प्रगती आणि अनुरागला भेटता येत नव्हतं. म्हणून या दोघांनी मिळून दिलीपचा काटा काढायचं ठरवलं. दोघांनी रामजी चौधरीला दोन लाख रुपयांची सुपारी दिली. रामजी चौधरी याने दिलीपला गाठलं आणि शेतात जाऊन मारहाण केली आणि गोळी घातली. जखमी दिलीपला रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिलीपच्या भावाने पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर प्रगती आणि तिचा प्रियकर अनुराग दोषी आढळले. पोलिसांनी सर्वांना अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.