Chhaava: छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला नाही? पूर्व क्रिकेटर आकाश चोप्रा याचा सवाल

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ ( Chhaava ) चित्रपटाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप निर्माण केलेली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण महाराजांची यशोगाथा आणि महाराजांच्या साहसाची चर्चा करू लागले आहे.  परंतु ‘शाळेच्या इतिहासामध्ये मात्र संभाजी महाराजांबद्दल फार काही माहिती नाही, तसेच संभाजी महाराजांचा फार कुठे उल्लेखही नाही’ असे ‘एक्स’ या माध्यमाच्या माध्यमातून पूर्व क्रिकेटर आकाश चोप्रा ( Aakash Chopra ) याने काही प्रश्न विचारले आहेत.

आकाश चोप्रा असे म्हणाला की, इतक्या साहसी योद्ध्याबद्दल आपल्याकडे इतिहासात फारशी चर्चा का नाही, आपल्याला शाळेमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती देखील कुणी दिली नाही. आपल्याला फक्त इतकेच शिकवले की, अकबर हा खूप मोठा साहसी आणि न्यायप्रिय राजा होता. हे इतक्यावरच थांबलं नाही तर हिंदुस्थानाच्या राजधानीमध्ये म्हणजे दिल्लीत अकबराच्या नावाने एका मार्गाचे नाव आहे. हे असं का घडलं आणि केव्हा घडलं असे अनेक प्रश्न आकाशने ‘एक्स’ या माध्यमाद्वारे विचारले आहेत.
‘छावा’ चित्रपटाची निर्मिती ही ‘छावा’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवरून करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशलने धर्मवीर संभाजी राजे यांची भूमिका वठवली आहे. ‘छावा’ या चित्रपटाने अल्पावधीतच चांगली बक्कळ कमाई केली असून, हा चित्रपट सध्याच्या घडीला देशासह- परदेशातही हिट चित्रपट म्हणून प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे.