ईडीची नोटीस देऊनही वाल्मीक कराडला अटक का नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल

संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. पण जेव्हा वाल्मीक कराडला ईडीची नोटीस येऊनही त्याच्यावर कारवाई का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यानंतर सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वाल्मीक कराडवर मोक्का का नाही लावला? वाल्मीक कराडला ईडीची नोटीस आली आहे. कराडवर खंडणी मागितल्याचा आरोप, हत्येचा आरोप आणि बेकायदेशी व्यवसाय करण्याचे आरोप त्याच्यावर आहे. कराडवर कुठल्याही राजकीय केसेस नाहीत. वाल्मीक कराडने अवदा कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण केलं होतं. अशी केस मे महिन्यात दाखल झाली होती. या केसमध्ये आणि ईडीच्या केसमध्ये कराडचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
तसेच मला एकच प्रश्न सरकारला विचारायचा आहे की संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. या सगळ्यांवर केसेस चालल्या. मग वाल्मीक कराडमध्ये काय विशेष आहे की, वाल्मीक कराडकडे कुणाबद्दल माहिती आहे की त्याला विशेष वागणूक दिली जाते? हा सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे. वाल्मीक कराडकडे अशी काय माहिती आहे की त्याच्या विरोधात सरकार कडक कारवाई करत नाही? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असेही सुळे म्हणाल्या.