एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल

आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिल्लीचा चित्ररथ नसल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. यामागे त्यांचा राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. तसेच दिल्लीचा आणि आमचा एवढा द्वेष का असा संतप्त सवालही त्यांनी केला. दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या हेतूबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केंद्र सरकारवर पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधून दिल्लीचा चित्ररथ ( झांकी) नसल्याच्या निर्णयावर टीका केली. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्याचा चित्ररथ ( झांकी, झलक) सादर करण्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. केजरीवाल यांनी या निर्णयामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाची राजधानी म्हणून दिल्लीला राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान आपली झांकी दाखवण्याची संधी सतत का नाकारली गेली, असा सवालही त्यांनी केला.

दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि 26 जानेवारीच्या परेडमध्ये दिल्लीच्या झांकीने दरवर्षी सहभागी व्हायला हवे. गेली अनेक वर्षे दिल्लीच्या झलकला परेडमध्ये सहभागी होऊ दिले जात नाही. हे कसले राजकारण? का? ते दिल्लीच्या लोकांचा इतका द्वेष करतात का? असा सवाल केजरीवाल यांनी केला.

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे मुद्दे नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपची निवडणूक रणनीती केवळ आपल्यावर आणि आपवर हल्ला चढवणे एवढीच आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. त्यांच्याकडे दिल्लीतील जनतेच्या विकासाची दृष्टी नाही. ते फक्त केजरीवाल आणि आप ला शिव्या देतात. यासाठीच आपण त्यांना मत द्यायचे का? असा सवालही त्यांनी केला. प्रत्युत्तरादाखल दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल यांच्यावर प्रत्युत्तर देत राष्ट्रीय सणांचा वापर राजकीय अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोप केला.