जय भीमनगरच्या कारवाईसाठी साकीनाका पोलिसांचे संरक्षण का? कोर्टाने मागितला खुलासा

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जय भीमनगरमधील झोपडपट्टय़ांवर कारवाई करण्यासाठी साकीनाका पोलिसांनी संरक्षण कसे दिले, असा सवाल उच्च न्यायालयाने बुधवारी केला.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा सवाल केला. याचा खुलासा साकीनाका पोलीस ठाण्यातील अधिकाऱयाने न्यायालयात हजर राहून करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

वास्तव्याचे पुरावे असतानाही महापालिकेने झोपडय़ांवर कारवाई केली. आम्हाला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. कारवाई करणारे पालिका व पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंदवावा. आम्हाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने प्रशासनाला द्यावेत. आम्हाला आमच्या जागेतच नवीन घरे बांधून द्यावीत, अशी मागणी करत येथील झोपडीधारकांनी याचिका दाखल केली आहे. खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

आम्ही केवळ संरक्षण दिले

कारवाईशी आमचा काहीही संबंध नाही. कारवाईसाठी पालिकेने आमच्याकडे संरक्षण मागितले. आम्ही संरक्षण दिले, असा दावा मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी पोलिसांकडून केला.