
अभिनेता सागर कारंडे याची ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रसिकांना झाली. सागर याआधी अनेक एकांकिका नाटकांमधून भेटीस आला होता. परंतु हा विनोदवीर आपल्या लक्षात राहिला तो त्याच्या स्त्री पात्राच्या भूमिकांमधून. सागरने वठवलेली स्त्री पात्रं आजही अनेकांच्या स्मरणात आहे. स्त्रियांची देहबोली हावभाव अश्या छोट्या गोष्टी त्याने अगदी सहजसुलभ वठवल्या. परंतु अलीकडेच सागरने यापुढे स्त्री पात्र करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षकांना सागरने अचानक असा का निर्णय घेतला असा संभ्रम निर्माण झालेला आहे.
View this post on Instagram
विनोदाच्या अचूक टाइमिंगने सागरने कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून, सागर हा अल्पावधीत अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला. परंतु सागरने स्त्री पात्र न वठवण्याचा निर्णय इन्स्टाग्रामवर जाहीर केल्यानंतर, अनेक चाहत्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला. चाहत्यांच्या प्रश्नावर अजूपर्यंत तरी सागरकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. सागरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याचा एक चाहता म्हणाला, ”तुम्ही तर श्रेया बुगडे यांच्यापेक्षा उत्तम स्त्री पात्र वठवता मग असा का निर्णय घेतला?” दुसरा एक चाहता पोस्ट करत म्हणतो, ”तुम्ही साकारलेल्या स्त्री पात्रांनी आम्हाला खूप हसवलं आहे, काय बुवा असा काय निर्णय घेतलात?”
सागर हा केवळ विनोदाचा बादशहाच नाही तर, त्याला भावनिक अभिनयाचे कंगोरे देखील उत्तम मांडता येतात. सागरने चला हवा येऊ द्या मध्ये पोस्टमनचे पात्र अतिशय उत्तम रंगवले होते. सागर पोस्टमन म्हणून यायचा आणि पत्र वाचायचा त्यावेळी अनेकजण डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचे. एखाद्या कसलेल्या कलाकारामध्ये जे कलागुण लागतात ते सर्व सागरकडे आहेत यात शंकाच नाही. येत्या काळात सागरने स्त्री पात्र न साकारण्याचा का निर्णय घेतला हे कळेलच. तोपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार यात काहीच दुमत नाही.