अमेरिकेतील अवैध स्थलांतरीतांच्या लँडिगसाठी पंजाबचीच निवड का? विरोधकांचा मोदी सरकारला सवाल

अमेरिकेतील अवैध स्थलांतरीतांना देशाबाहेर पाठवण्यासाठी अमेरिकेने शोध मोहिम राबवत अवैध स्थलांतरीतांना त्यांच्या देशात परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. अवैधरीतीने अमेरिकेत राहणाऱ्या हिंदुस्थानींना परत आणणारे पहिले विमान 5 फेब्रुवारी रोजी अमृतसरमध्ये उतरले. त्यात 104 अवैध स्थलातरीत होते. अमेरिकेतून हद्दपार केलेल्या हिंदुस्थानींना परत आणणारी आणखी दोन विमाने 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी अमृतसर येथे उतरणार आहेत. या अवैध स्थलांतरीतांच्या लँडिगसाठी पंजाब राज्याचीच निवड का करण्यात आली? असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे. तसेच यामागे मोदी सरकारचा राजकीय हेतू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन येणाऱ्या विमानांच्या अमृतसरमध्ये उतरवण्यावरून नवीन राजकीय वादाला तोड फुटले आहे. मोदी सरकारने जाणूनबुजून अमृतसरला लँडिंग पॉइंट म्हणून निवडल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. लँडिगसाठीइतर राज्यांऐवजी पंजाबची निवड केल्याबद्दल विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. या विमानांचे लँडिग पंजाबमध्ये करून राज्याला बदनाम करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे आणि या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेतून येणारी विमाने अमृतसरमध्येच का उतरवली जात आहेत? यामागे पंजाबला बदनाम करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचे ते म्हणाले. ही विमाने हरियाणा किंवा गुजरातमध्ये का उतरत नाहीत? भाजप पंजाबला लक्ष्य करत आहे. ही विमाने अहमदाबादमध्ये उतरली पाहिजेत,असेही ते म्हणाले.

काँग्रेस आमदार परगत सिंग यांनीही अमेरिकेतून येणारी विमाने नेहमी पंजाबमध्ये उतरवणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. अवैध स्थलांतरीतांमध्ये पंजाबचे नागरीक आहेत. मात्र, इतर राज्यातील नागरिकही त्यात आहेत. तसेच हे अवैध स्थलांतरीत हिंदुस्थानचे नागरिक आहेत. त्यांना अपमानास्पद पद्धतीने आणल्याबाबतही त्यांनी टीका केली. वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक कंवर संधू म्हणाले की, देशाची राजधानी असल्याने ही विमाने दिल्लीत उतरवली पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे परत येणाऱ्या दुसऱ्या तुकडीला योग्य ती वागणूक देण्यात येत आहे की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त पंजाबच नाही तर अनेक राज्यांमधून निर्वासित होते. जर विमानात पंजाबच्या नागरिकांची संख्या जास्त असेल तरच ते अमृतसर येथे उथरवले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.