
आपल्या आरोग्यासाठी कांद्याचे फायदे हे खूपच अदभूत आहेत. कांद्यामुळे आपल्या हृद्याचे आरोग्य सुधारते. तसेच कांद्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. पण केवळ इतकेच नाही तर, कांदा आपल्या आरोग्यासोबत आपल्या केसांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कांद्यामुळे केसगळती तर थांबते, शिवाय केसवाढीसाठी कांदा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. कांदा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कांदा हा आपल्या भारतीयांच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असतो. मुख्य म्हणजे केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला स्रोत आहे. कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म चांगले असतात. यामुळे केसांचे संरक्षण होण्यास मदत होते.
केसगळतीवर कांद्याचा वापर कसा करावा?
मध आणि कांद्याचा रस– केस कोरडे झाले असतील तर, कांद्याचा आणि मधाचा रस हा खूप उपयोगी आहे. मधामुळे आपल्या केसांना चांगले कंडिशनिंग होण्यास मदत होते. तर कांद्याच्या रसामुळे केस निरोगी आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते. कांद्याचा रस हा केसवाढीसाठी उत्तम मानला जातो.
एका भांड्यात कांद्याचा रस आणि मध मिसळून मिश्रण तयार करा. आता हा रस आपल्या केसांच्या मुळाशी लावावा. रस लावून झाल्यानंतर गोलाकार पद्धतीने मालिश करावे आणि त्यानंतर अर्ध्या तास हा रस तसाच ठेवून द्यावा. अर्ध्या तासानंतर व्यवस्थित शॅम्पोने केस धुवावे. हा उपाय आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा करावा.
लिंबु आणि कांद्याचा रस– मजबूत केसांसाठी आपण लिंबाचा रस आणि कांद्याचा रसाचा वापर करु शकतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी हे खूप मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे कोलेजनच्या निर्मितीस मदत करतात. आपल्या केसांच्या मूळांना बळकट करण्यासाठी आणि निरोगी बनविण्याकरता व्हिटॅमिन सी हे खूप गरजेचे आहे. लिंबाचा आणि कांद्याचा रस हा डोक्यातील कोंडा दूर करण्यात मदत करतो तसेच केसांचे आरोग्यही उत्तम ठेवतो.
एक चमचा कांद्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण आपल्या केसांच्या मूळाशी लावावे. एक तास हे मिश्रण केसांवर तसेच ठेवून, नंतर केस धुवावे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)