हिंदू धर्मात कन्यादान का केले जाते? वाचा बापलेकीच्या नात्यातील अनोख्या सोहळ्याविषयी

घरी मुलगी जन्माला आली की, एक वाक्य हमखास कानावर पडते ते म्हणजे मुलगी म्हणजे परक्याचं धन. म्हणूनच लाडाकोडात वाढवलेल्या लेकीचं कन्यादान करताना लग्नात लेकीचा बाप खूपच हळवा होतो. हिंदू धर्मामध्ये कन्यादान हा केवळ एक विधी नाही तर ही असते बाप लेकीच्या नात्यातील एक महत्त्वाचा विधी. हा विधी संस्कार म्हणूनच अनेक लग्नकार्यात ओळखला जातो.
आपल्या हिंदू धर्मामध्ये कन्यादानाचे महत्त्व हे खूप अबाधित आहे. कन्यादान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. म्हणूनच या  कन्यादानाला महादान असेही म्हटलेले आहे. कन्यादान हा लग्नातील विधीमधील सर्वात महत्त्वाचा विधी मानला जातो. या विधी संस्काराच्या वेळी मुलीचे वडील केवळ आपली कन्या जावयाला देत नाहीत, तर अग्निला साक्षी ठेवून आपल्या मुलीचे गोत्र दान करतात. म्हणूनच या विधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही कन्यादान म्हणजे मुलीला दान करणे असे म्हटले जाते. परंतु हा कन्यादानाचा मथितार्थ अजिबात नाही. हिंदू धर्मामध्ये लग्नाचे २२ टप्पे असतात. यात कन्यादान हे खूप महत्त्वाचे मानले जाते.
आजही कन्यादान हे सर्वात मोठे पुण्य असल्याचे मानले जाते. एवढंच नाही तर, या कन्यादानाच्या वेळी जे मंत्रोपचार होतात तेही तितकेच अर्थपूर्ण असतात. यादरम्यान वडील जावयाकडून आपल्या लेकीला कायम सुखात ठेवण्याचं वचन मागून घेतात. हे इथवरच नाही तर, मुलीची सुरक्षा, आनंद या सर्वांची जबाबदारी यापुढे मुलाची असल्याचेही वडील जावयाला सांगतात आणि आपली कन्या जावयाच्या हाती सुपूर्द करतात. म्हणूनच कन्यादान सोहळ्यात बाप लेकीच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. उपस्थितही हा सोहळा बघून भावूक होतात.