
21 मार्च हा दिवस बोलक्या बाहुल्यांचा दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. हा दिवस खऱ्या अर्थाने बाहुल्यांची कला सादर करणाऱ्यांसाठी समर्पित करण्यात आलेला आहे. जगभरातील बोलक्या बाहुल्यांची कला सादर करणाऱ्या कलाकारांना यानिमित्ताने श्रद्धांजली वाहिली जाते. जगभरामध्ये बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम करणारे हजारो कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा आजच्या युगातही बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम खूप चालतात. हेच बोलक्या बाहुल्या कलेचे यश म्हणावे लागेल.
बोलक्या बाहुल्यांच्या दिवसाची स्थापना ही 1966 साली अमेरिकेतील युनियन इंटरनॅशनल डे मॅरिएनेट (UNIMA) या संस्थेने पहिल्यांदा सुरुवात केली होती. त्यानंतर बोलक्या बाहुल्यांचा दिवस जगभरामध्ये साजरा करण्यात येऊ लागला.
बाहुल्यांच्या कलेला समाजामध्ये ओळख मिळावी याच हेतूने हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला होता. याच कलेला हिंदुस्थानमध्ये शब्दभ्रम कला या नावाने ओळखले जाते.
बोलक्या बाहुल्यांची कला ही खूप प्राचीन काळापासून प्रचलीत असलेली कला आहे. जगभरात या बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारे अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. इंग्लंड, जर्मनी, इटली, इजिप्त, नेदरलॅंड, डेन्मार्क, रोमानिया, फ्रान्स या देशांमध्ये बोलक्या बाहुल्यांचे खेळ मोठ्या प्रमाणात सादर केले गेले आहेत.
हिंदुस्थानाचा विचार केला तर आपल्याकडे, कळसूत्री बाहुल्यांचे मूळ हे प्रामुख्याने राजस्थानामध्ये सापडते. आपल्या हिंदुस्थातील पौराणिक ग्रंथांमध्येही बाहु्ल्यांचा उल्लेख पाहायला मिळतो. राजस्थानातील बाहुल्या जगभर प्रसिद्ध आहेत. याशिवाय, ओडिशा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही बोलक्या बाहुल्यांची कला लोकप्रिय आहे.