बेकायदा भोंग्यांवर कारवाई का नाही? हायकोर्टात याचिका

धार्मिक स्थळांवरील बेकायदा भोंग्यांवर कारवाई करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी करणारी अवमान याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेत 14 ऑगस्टला सुनावणी निश्चित केली. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे,  असा दावा करीत संतोष पाचलाग यांनी यापूर्वी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर 16 ऑगस्ट 2016 रोजी तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने बेकायदा भोंग्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र आठ वर्षे उलटूनही सरकारने बेकायदा भोंग्यांविरोधात कारवाई केलेली नाही, याकडे लक्ष वेधत पाचलाग यांनी 2018मध्ये दाखल केलेली अवमान याचिका शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सादर केली.