Protein- अधिक प्रमाणात प्रथिनांचे सेवन का आहे धोकादायक? वाचा सविस्तर

सध्याच्या घडीला प्रोटीन्स घेण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. खासकरून जीम करणाऱ्या व्यक्तींना प्रोटीन्स घेणं हे एक स्टेटस् सिम्बाॅल झालेलं आहे. प्रथिने आरोग्यासाठी आवश्यक आहेत, परंतु त्याचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते. योग्य प्रमाणात प्रथिने घेतल्याने शरीराला फायदा होतो आणि आजारांचा धोका कमी होतो. म्हणूनच वयानुसार आणि गरजेनुसार प्रथिने खाणं हे केव्हाही उत्तम.

आपल्या आरोग्यासाठी अधिक प्रमाणात प्रथिने सेवन करणे हे धोकादायक मानले जाते. प्रथिनांशिवाय निरोगी शरीराची कल्पनाही करता येत नाही. प्रथिने हे आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषणांपैकी एक आहे. प्रथिने आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी उत्तम मानली जातात. तसेच यामुळे आपले चयापचयही उत्तम राहते. परंतु जास्त प्रमाणात प्रथिने घेणे हे आपल्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे.

अधिक प्रमाणामध्ये प्रथिने घेतल्यावर काय परिणाम होतात?

 

अधिक प्रमाणामध्ये प्रथिनेयुक्त आहार घेतल्यामुळे हाडे हळूहळू कमकुवत होतात. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने सेवन केल्याने शरीरातून कॅल्शियम बाहेर पडते. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

 

प्रथिनेयुक्त आहार अधिक प्रमाणात घेतल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळेच डिहायड्रेशनचा त्रासही होऊ शकते.

 

प्रथिनांचा अतिरेक झाल्यामुळे, कॅलरीज मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा परिणाम वजन अधिक वाढण्याची शक्यता असते.

 

प्रथिने खाल्ल्याने मूत्रपिंडांवर दबाव वाढतो. शरीर अधिक प्रथिने पचवण्यात व्यस्त असते तेव्हा मूत्रपिंडांवर अतिरिक्त भार पडतो. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

 

अधिक प्रमाणामध्ये प्रथिनांच्या सेवनामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या घातक आजारांचा धोका वाढतो.

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)