हिंदुस्थानी स्थलांतरितांना बेड्या ठोकून का आणले? परराष्ट्र मंत्र्यांच्या उत्तराने संसदेत गदारोळ; सभागृहाबाहेरही जोरदार निदर्शने

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या हिंदुस्थानींना मायदेशात परत पाठवण्याची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तसेच त्यांना हिंदुस्थानात आणताना त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन झालेले नाही, असे उत्तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नाला दिले. यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. सभागृहाबाहेर विरोधकांनी सरकारविरोधात निदर्शने केली. विरोधकांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना दिलेल्या वागणुकीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सरकारला सळो की पळो करून सोडले. हिंदुस्थानी नागरिकांना बेड्या ठोकून का आणले? असा सवाल विरोधकांनी केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

दोन्ही सभागृहांत कामकाज सुरू होताच विरोधकांनी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी विरोधकांच्या वतीने बेकायदा स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून कामकाज स्थगित करण्याचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांसमोर ठेवला. जयशंकर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. लोकांनी तुम्हाला त्यांच्या समस्या, मुद्दे संसदेत मांडण्यासाठी निवडून दिले आहे, परंतु, तुम्ही संसदेत आंदोलने करत आहात. ही पद्धतच चुकीची आहे, असे ओम बिर्ला म्हणाले. परंतु, विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला.   त्यामुळे अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. राज्यसभेतही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  

काय म्हणाले परराष्ट्रमंत्री?

2009 पासून अमेरिकेतून अवैध प्रवाशांना हिंदुस्थानात परत पाठवण्यात येत आहे. गेल्या 16 वर्षांत अमेरिकेतून 15 हजार 652 बेकायदा स्थलांतरित हिंदुस्थानींना परत पाठवण्यात आले. यात सर्वाधिक 2019 मध्ये 2042 हिंदुस्थानीना परत पाठवण्यात आले. बेकायदा स्थलांतरितांना आपला देश कधीच पाठिंबा देणार नाही. कारण, अवैधरीत्या एखाद्या देशात गेल्यावर तेथील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे एस. जयशंकर म्हणाले.  

हिंदुस्थानी नागरिकांना एलियन्स म्हटले

अमेरिकेचे सीमा गस्ती प्रमुख मायकल बँक यांनी एक्सवरून अवैध हिंदुस्थानींना स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेचा व्हिडीयो जारी केला आहे. बेकायदा एलियन्सना आम्ही यशस्विरीत्या पुन्हा हिंदुस्थानात पाठवत आहोत. आतापर्यंतचे सर्वात मोठे डिपोर्टेशन आहे. त्यासाठी लष्कराच्या विमानाचा वापर करत आहोत. तुम्ही अवैधरीत्या एखाद्या देशात घुसता तेव्हा तुम्हाला परत पाठवले जाईल, अशी पोस्ट बँक यांनी केली आहे.  

परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्यांसाठी कायदा आणणार

अवैध स्थलांतरितांचा मुद्दा पेटल्यानंतर आता केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी नवा कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. परराष्ट्र व्यवहारासाठी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने ओव्हरसीज मोबिलीटी विधेयक 2024 या विधेयकाचा प्रस्ताव समोर ठेवला. रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे हा या कायद्याचा उद्देश आहे.   

गैरवर्तन होऊ नये यासाठी अमेरिकन सरकारशी चर्चा

परत येणाऱ्या बेकायदा स्थलांरितांना हिंदुस्थानींना कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करावे लागू नये यासाठी आम्ही अमेरिकन सरकारशी चर्चा करत आहोत, असेही ते म्हणाले. जर नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळले तर त्यांना परत घेण्याची जबाबदारी सर्व देशांची आहे, असे त्यांनी नमूद केले.