
बॉलिवूड चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. मनोज कुमार यांची बॉलिवूडमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारे कलाकार अशी ओळख होती. मनोज कुमार हे केवळ एक अभिनेता नव्हते, तर वैयक्तिक आयुष्यात परखड भूमिका घेण्यासाठी देखील ते प्रसिद्ध होते.
मनोज कुमार एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी सरकारविरुद्ध खटला दाखल केला होता. केवळ खटला दाखल करुन ते थांबले नाहीत, तर तो खटला त्यांनी जिंकला सुद्धा होता. हे प्रकरण आणीबाणीच्या काळातील आहे. 1975 मध्ये जेव्हा इंदिरा गांधींच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली तेव्हा मनोज कुमार यांनी त्याचा विरोध केला होता. सरकार यावर नाराज होते. परिस्थिती अशी होती की आणीबाणीला विरोध करणाऱ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होताच सरकार त्यांच्यावर बंदी घालत होते.
मनोज कुमार यांच्या चित्रपटावर बंदी
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मनोज कुमार यांच्या ‘दस नंबरी’ या चित्रपटावर बंदी घातली. तसेच दुसरा चित्रपट ‘शोर’ बाबतीतही तेच केले. एवढेच नाही तर ‘शोर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दूरदर्शनवर दाखवण्यात आला होता, त्यामुळे तो चित्रपटगृहात पोहोचला नाही आणि दिलीप कुमार यांचे मोठे नुकसान झाले होते. संतप्त मनोज कुमार यांनी इंदिरा सरकारविरुद्ध खटला दाखल केला आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो खटला जिंकला होता.
मनोज कुमार सहमत नव्हते
केस हरल्यानंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना ‘इमर्जन्सी’वर चित्रपट बनवण्याची ऑफर दिली. मंत्रालयाने मनोज कुमार यांना पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला पण मनोज कुमार सहमत झाले नाहीत आणि त्यांनी ऑफर नाकारली. एवढेच नाही तर प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांनाही या चित्रपटाची पटकथा लिहिल्याबद्दल त्यांनी फटकारले होते.